Jalna Crime News Toady: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडित तरुणी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, अटकेतून वाचण्यासाठी आरोपीने स्वतःचे बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा हा डाव हाणून पाडला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचे वचन दिले होते. या आमिषाला बळी पडून पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला. या काळात आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी पीडित तरुणी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. जेव्हा तिने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने आपली फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. अखेर पीडितेने बदनापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
बनावट जन्म प्रमाणपत्राचा बनाव
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा (Jalna Crime News Toady) दाखल करत आरोपीला अटक केली. मात्र, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आरोपीने एक मोठी खेळी खेळली. त्याने पोलिसांना स्वतःचे एक जन्म प्रमाणपत्र सादर केले. या प्रमाणपत्रात त्याने आपले वय केवळ १६ वर्षे ६ महिने असल्याचे दाखवले होते. स्वतःला अल्पवयीन सिद्ध करून शिक्षेपासून वाचण्याचा त्याचा हा प्रयत्न होता.
पोलिसांनी असा शोधला ‘खोटेपणा’
आरोपीने सादर केलेल्या कागदपत्रांवर पोलिसांना संशय आला. बदनापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय अजय जयस्वाल आणि त्यांच्या पथकाने या कागदपत्रांची सखोल तांत्रिक पडताळणी केली. तपासाअंती समोर आले की, आरोपीने सादर केलेले जन्म प्रमाणपत्र बनावट होते. त्याचे खरे वय १८ वर्षे ६ महिने असल्याचे निष्पन्न झाले. वयाचा खोटा पुरावा सादर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न फसला.
न्यायालयीन कोठडी आणि पुढील तपास
आरोपीचे खरे वय समोर आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत की, हे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्याला कोणाची मदत लाभली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.










