राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

मुद्रांक शुल्क: महाराष्ट्र राज्यातील मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी आता अधिक खर्चिक झाली आहे. राज्य सरकारच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, दस्त नोंदणी करताना आकारले जाणारे प्रति पान शुल्क २० रुपयांवरून थेट ४० रुपयांवर नेण्यात आले आहे. या निर्णयाचे आदेश नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, म्हणजेच महानिरीक्षक नोंदणी कार्यालयाकडून अधिकृतरीत्या जारी करण्यात आले आहेत.

मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

या शुल्कवाढीचा थेट परिणाम घर खरेदीदार, मालमत्ता व्यवहार करणारे नागरिक, तसेच व्यवसायिक दस्तऐवजांची नोंदणी करणाऱ्या सेवाप्रदात्यांवर होणार आहे. यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया आता अधिक महागडी ठरणार आहे. नुकतीच नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आलेली असताना आता हाताळणी शुल्कातही वाढ केल्यामुळे, ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ने सरकारकडे नाराजी व्यक्त करत ही वाढ योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दस्त नोंदणी व मुद्रांक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात उपनिबंधक कार्यालयांची संख्या वाढली असून, दस्त प्रक्रिया अधिक संगणकीकृत बनली आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या ३५ प्रणाली, विविध सॉफ्टवेअर्स, हार्डवेअर्स आणि नेटवर्कची देखभाल यांसाठी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कुशल मनुष्यबळाचा खर्चही वाढला असल्याने ही शुल्कवाढ अनिवार्य झाली असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.

सध्या राज्य सरकारला दस्त नोंदणीच्या माध्यमातून सरासरी दरमहा सुमारे ४००० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे. हाताळणी शुल्कात झालेल्या वाढीमुळे या उत्पन्नात आणखी भर पडणार असून, यामुळे सरकारच्या तिजोरीला आर्थिक फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सरकारला किती अतिरिक्त महसूल मिळेल, याचा अंदाज लवकरच जाहीर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा