ऊस तोडीच्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादातून जालना जिल्ह्यात एका 40 वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा बुद्रुक परिसरात घडली आहे. मृत महिलेचे नाव उषाबाई सदाशिवे असे असून, दुपारी जवखेडा शिवारातील एका कापसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासात खुनाचे कारण उघड
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ऊस तोडीच्या मजुरीच्या पैशावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऊस तोडीचा मुकादम असलेल्या शरद राऊत याला संशयावरून ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चोरीच्या घटनांत वाढ, प्रवासी दहशतीत
दरम्यान, धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले असून, चोरट्यांच्या कारवायांचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये काही चोरटे चालत्या ट्रॅव्हल्सवर चढून प्रवाशांच्या बॅगा चोरण्याची धक्कादायक पद्धत वापरत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना चित्रपटातील दृश्यासारखी वाटावी अशी आहे.
प्रवासी वाहनांना अडवून लूटमार
सोलापूर ते धुळे महामार्गावरील पाचोड ते येडशी दरम्यान काही ठिकाणी प्रवासी वाहन अडवून किंवा थांबलेल्या वाहनांतील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याशिवाय ट्रॅव्हल्सच्या छतावर ठेवलेल्या बॅगा लंपास करण्याच्या घटनाही घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, अशा चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध सुरू आहे. हॉटेल चालकांच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना सावधगिरीचा इशारा
पोलीस प्रशासनाने प्रवाशांना प्रवासादरम्यान खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ट्रॅव्हल्स जेव्हा जेवणासाठी थांबतात, तेव्हा काही चोरटे गाडीच्या छतावर लपून बसतात. काही अंतर गेल्यानंतर ते बॅगा खाली फेकतात आणि खाली थांबलेले साथीदार त्या गोळा करून मौल्यवान वस्तू चोरून पसार होतात. टोलनाका किंवा चढावर गाडीचा वेग कमी होताच चोरटे उतरून पळ काढतात.
या घटनांमुळे प्रवाशांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.










