जालना शहरातील गजबजलेल्या सराफा बाजार परिसरात अग्निशमन विभागाने कारवाई करत एका अनाधिकृत फटाका दुकानाला सील केले. कोणतीही परवानगी न घेता तसेच आवश्यक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून फटाके साठवणूक व विक्री सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अग्निशमन विभागाच्या पथकाने अचानक तपासणी करताना दुकानात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील फटाके साठवलेले असल्याचे निदर्शनास आणले. अरुंद बाजारपेठ, वर्दळीचा परिसर आणि अग्निसुरक्षा साधनांचा अभाव लक्षात घेता संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढला होता. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ दुकान सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कारवाईदरम्यान संबंधित दुकानदाराला नोटीस देण्यात आली असून, नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इतर भागांतही अशा प्रकारच्या अनाधिकृत फटाका विक्रीवर लक्ष ठेवून नियमित तपासण्या करण्यात येणार असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे व कोणतीही संशयास्पद विक्री आढळल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.










